Friday, December 1, 2017

तेच ते

तेच ते, तेच ते,
तेच ते आणि तेच ते...

तेच ते दगड, तीच ती माती,
त्याच त्या विटा आणि तीच ती रेती

तेच ते रडणे, तेच ते हसणे
तेच ते tv समोर तासनतास बसणे

त्याच त्या मालिका, तीच ती रडारड,
ACP प्रद्युमन च्या टीम ने केलेली
तीच ती धरपकड

तोच तो तळहात तेच ते चटके,
त्याच त्या लादिवर फिरणारे तेच ते कटके

तीच ती नोकरी, तीच ती ट्रेन,
त्याच त्या गर्दीत आऊट होणारे,
तेच ते ब्रेन,

तेच ते राजकारण, तेच ते आरोप,
तीच ती उदघाटने आणि तोच तो समारोप

तेच ते चॅटिंग, तेच ते प्रेम,
फक्त पहिल्याला सोडून
दुसऱ्यावर धरलेला नेम

आणि तेच ते आयुष्य....

तेच ते आयुष्य, तेच ते दिवस,
तोच तो प्रवास आणि तेच ते मृत्यूचे सावट

नाही राहिले आता फक्त
तेच ते माझे मन,

ते पेटलंय, जळलंय,
जळून खाक झालंय...
उरली आहे आता फक्त राख.

तीच ती राख
एका मेलेल्या माणसाची
जो कधी जिवंत होता

ती ही नष्टच होईल,
जेव्हा कोणाच्या तरी आपल्याच व्यक्तीच्या हातातून
त्या राखेचे पाण्यात विसर्जन होईल.
-
©सचिन सावंत
०१/१२/२०१७

Sunday, November 26, 2017

अनभिज्ञ

कशा करू कविता आता
ज्यांचा काही उपयोगच होत नाही,
तुझ्यापर्यंत पोचव्यात या माझ्या इच्छेला
पूर्णत्व ही येत नाही,

नसतील पोचत तुझ्यापर्यंत तर
काय उपयोग आहे कवितांचा,
बंद करावेत हे उपद्व्याप
असा सल्ला आहे अनेकांचा..

त्यांचा सल्ला मानावा की नाही
हाच प्रश्न तसा आहे,
पण शेवटी, तूच आहेस माझ्या आयुष्यात
बाकी सर्व वजा आहे...

कंटाळा आला असेल तुला
माझ्या कवितांचा,
तर तसे सांग ना मला स्पष्ट,
उगीच कशासाठी, अन कुणासाठी
घेतोय मी इतके कष्ट

तू असशील तुझ्या आयुष्यात सुखी
पण माझ्या आयुष्यात मी आहे का ?
तुला याच्याशी काहीच देणे घेणे नाही,
हा माझा विचार तरी खोटा आहे का ?

रहा तू सुखी,
अन अनभिज्ञ माझ्या प्रत्येक गोष्टीशी
आता आयुष्यात कधीच नाही येणार मी
गुंतायला तुझ्यात, आणि बोलायला तुझ्याशी...

-
©सचिन सावंत
२६/११/२०१७

Wednesday, November 8, 2017

माणसाची मानसिकता

माणसाची मानसिकता हल्ली कशी आणि किती कमी कालावधीत बदलेल त्याचा अंदाज लावणे मुश्किल झालेले आहे, म्हणजे परवा परवा पर्यंत आपल्याला एखादी व्यक्ती जशी वाटत असते, त्या व्यक्तीचा स्वभाव जसा वाटत असतो, त्याच्या अगदी विरुद्ध वागणे असते त्या व्यक्तीचे, म्हणजे आपल्या कल्पनेच्या पलीकडचे सुद्धा असू शकते. दर्जा बाबत न बोललेलेच ठीक कारण व्यक्तिसापेक्ष हे सिद्धांत बदलत असतात. फक्त आपण विश्वास (खरं तर अंधविश्वास) ठेवलेल्या व्यक्तीने आपल्या कल्पने पलीकडे वागणे हा धक्का आपल्याला पचवता येणे अवघड असते. अशा वेळी मग आपण त्या व्यक्तीला ओळखण्यात चूक केली, असे म्हणावे लागते आणि आपल्या मनाला समजवावे लागते. पण इतका साधा सरळ विचार करून चालण्यासारखे असते का ? तर नाही. वागण्यातील बदल कोणत्या पातळीवरचा आहे यावर हे ठरते. मग ते "ठीक आहे" इथपासून ते "त्या व्यक्तीला संपवून टाकले पाहिजे" इथपर्यंत काहीही असू शकतो.
सर्वात मोठी शोकांतिका कधी असते? एखादी व्यक्ती आपल्याशी कायम खोटं बोलत राहिली आहे, कायम विश्वासघात करत राहिली आहे, ही जाणीव होणे. आणि मग स्वतः ला स्वतःवरच राग यायला लागतो. कारण माणूस ओळखण्यात चूक झालेली असते. अशा वेळी आपलीच कसोटी असते, ती म्हणजे आपण यातून किती लवकर सावरतो याची. किंबहुना सावरु शकतो की नाही याची.
-
© सचिन सावंत

Wednesday, November 1, 2017

आठवणी

मान्य आहे मला
माझ्या जीवनात नाहीस आता तू..
तुझं #अस्तित्व,
तुझं #हास्य,
तुझी माझ्याशी बोलण्याची #अधीरता,
मला भेटण्याची #ओढ,
तुझी माझ्याबद्दलची #काळजी,
काहीच उरलं नाहीये आता..

कसा विसरू मी,
तुझे उष्ण श्वास,
तुझी घट्ट मिठी,
तुझं माझ्या बाहुपाशात विसावणं,
तुझं माझ्यात आपोआप विरघळत जाणं,
तुझं माझ्याकडे पहात राहणं,
आणि म्हणणं,
तुमचा चेहेरा खूप छान वाटतो मला..

नाही राहिले माझे काहीही आता,
पण
एक गोष्ट आहे माझ्याजवळ,
जी कोणी कधीच हिरावून घेऊ शकत नाही माझ्याकडून...
'तुझ्या आठवणी.'

आठवणी हीच अशी गोष्ट आहे,
ज्यांच्यावर #हक्क माझाच आहे,
आणि माझाच राहील,
कायमस्वरूपी..

कितीही प्रयत्न केला कुणीही तरी
तुला माझ्या आठवणीतून कोणीही #हिरावून नाही ना घेऊ शकत..
स्वतः तू ही नाही..

या आठवणी माझ्या #सोबतच राहतील नेहेमी,
आणि माझ्यासोबतच जातील,
विस्मृतीत सर्वांच्या...

तेव्हा तरी माझी तू आठवण काढशील का ?
हाच एक यक्ष प्रश्न उरलाय..
-
© सचिन सावंत

Sunday, October 29, 2017

आपण उद्या बोलूया...

केलंय तिने बेदखल
तिच्या आयुष्यातून मला
कायमचं..

वाळले सगळे झरे,
आपुलकीचे, प्रेमाचे, हक्काचे, काळजीचे..

आता उरलं फक्त वाळवंटी प्रवास..

आणि उरला एक शोध
एका मृगजळाचा,
की ती माझ्या आयुष्यात
परतून येईल पुन्हा..

कारण ती म्हणाली होती मला,
मी कसं इग्नोर करेन माझ्या जीवाला...

आज तिचा हा जीव तीळ तीळ तुटतोय
तिला एकदाच भेटायला,
तिच्याशी बोलायला,
तिचा हसरा चेहेरा पाहायला,
तिचा तो चेहेरा ओंजळीत घ्यायला,

बाकी नको आता काही मला,
नाही का जाणवत माझी तळमळ जरासुद्धा तुला..

एक होता काळ असा,
व्हायच्या तासनतास गप्पा,
प्रेमाच्या गोष्टी,
आणि बरेच काही,
पुरत नसायचा वेळ दिवसा,
म्हणून रात्रभर व्हायचं बोलणं,

आता दिवस मोजणं सोडून दिलं मी,
आम्हाला शेवटचं बोलून
लोटलाय किती काळ ?

आठवते मला,
तिची प्रत्येक गोष्ट,
आणि
शेवटचा मेसेज तिचा,
आपण उद्या बोलूया....!
आपण उद्या बोलूया.... !
-
© सचिन सावंत
२९/१०/२०१७

Tuesday, October 10, 2017

सुंदर मन

काय आहे सुंदर मनाची व्याख्या ?
समोरच्या माणसाने आपल्या मनासारखं वागणं म्हणजे त्याचं सुंदर मन का ?
उलट जे आपल्या तोंडावर स्पष्ट आणि खरं बोलतात त्या त्या व्यक्तीचं मन हे साफ असतं, आणि साफ मन नेहेमीच सुंदर असतं, हे कुणालाही पटेल. मनात एक आणि बोलायचं भलतंच असे करणाऱ्या व्यक्तीचं मन सुंदर असणे शक्यच नाही.
आणि त्यामुळेच सुंदर मन शोधणे कठीण असते असं म्हणतात, खरं आहे ते, पण सुंदर मनाचा एखादा माणूस आपल्या आयुष्यात आला तरी त्याला ओळखू शकत नसल्यावर काय होईल ? त्या माणसाचे मन वेळीच ओळखता आले पाहिजे, काही वेळा आपण एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा उगीचच बाऊ करून आपले सुंदर नाते हातचे घालवून बसतो, आणि नंतर पश्चात्ताप करतो. पण वेळ गेल्यानंतर काहीही उपयोग नसतो.

तेव्हा इगो सोडा, कोणत्याही फायद्याची अपेक्षा न करता निस्वार्थीपणे आपली काळजी घेणारी व्यक्ती, आपल्यावर प्रेम, खूप प्रेम करणारी व्यक्ती मिळणे हे भाग्य असते, त्याचं प्रेम, त्या व्यक्तीचं महत्व वेळीच ओळखा, अन्यथा वेळ निघून जाते कापरासारखी आणि हाती काहीच राहत नाही. असे होण्यापूर्वी भानावर या.

©सचिन सावंत

Saturday, August 26, 2017

मनाचिये गुंती

माणसाचे मन💗 हा खरं तर चिंतनाचा विषय आहे. या विषयावर PhD सुद्धा करता येऊ शकते असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती होणार नाही. या जगात मनाला कोणी समजू शकले आहे का ? मन कोणत्या वेळी कसे बदलेल, कोणत्या वेळी कोणता निर्णय घेईल हे प्रत्यक्ष ब्रम्हदेव सुद्धा सांगू शकत नाही. मनाने घेतलेली कलाटणी, मनाने घेतलेले निर्णय ओळखणे केवळ अशक्य.

कोडं



कसं जगावं
कसं वागावं

कुणाशी, कधी, कसे, कोणत्या परिस्थितीत ?

सगळंच कोडं
न सुटता येणारं.............

एखाद्याच्या जीवाला घोर लावणारं
हृदयाची धडधड वाढवणारं
मनाची घालमेल करणारं

कुणाला समजणारं तर कुणाला न समजणारं
कुणाला समजेल की नाही याची वाट पाहणारं

कुणाला माझी किती काळजी आहे हे दर्शवणारं
तर कुणी किती दुर्लक्ष करतं हे दाखवणारं

किती प्रेम आहे याची मोजदाद करता येणारं,
तर किती प्रेम असायला हवे याचे ठोकताळे बांधणारं

किती उत्कटता आहे हे सांगणारं
तर कुठे उत्कटता दिसताच नाही याचे दुःख मानणारं

समोरचा कधी बोलेल याची वाट पाहणारं
तर कुठे मीच का बोलू याचा इगो बाळगणारं

सगळंच कोडं
न सुटणारं

कधी सुटेल हे कोडं ? याची वाट पाहणारं.
-
© सचिन सावंत
२६/०८/२०१७

Sunday, February 19, 2017

फेसबुकायन

सोशल नेटवर्किंग चे काही do's and don'ts आहेत. जे इथे वावरताना आपण पाळले पाहिजेत असा नियम नाही पण तो एक कॉमन सेन्स आहे.
आपण फेसबुक वर काय टाकायचं आणि काय नाही ही प्रत्येकाची तशी खाजगी बाब आहे. त्याबद्दल मी काय म्हणणार ? पण सोशल आणि त्यातल्या त्यात नेहेमी online राहण्याच्या नादात आपल्याला हे भानच राहत नाही की आपण नक्की काय शेयर करतोय ?
काही जण उत्साहाच्या भरात शेयर करतात, "Going to kashmir with Family for 10 days" आणि मग याचा अर्थ १० दिवस त्या घरात कोणीच नाही हे सुद्धा समजते. आणि मग चोऱ्या होतात. त्यामुळे जरा जपूनच स्टेटस टाकला तर आपलेच नुकसान वाचेल.
काही महाभाग तर त्यांची कुठलीही पोस्ट ५० एक जणांना TAG करतात आणि पोस्ट करतात. त्यांना माझे एवढेच सांगणे आहे कि बाबांनो, अशाने तुमच्या पोस्ट चे Likes वाढणार नाहीत. त्यासाठी ती पोस्ट पण चांगली पाहिजे ना. हल्ली देवांचे, बाबांचे फोटोज ५० आणि कधीकधी त्यापेक्षा जास्त जणांना TAG करून Good Morning wish करतात. पण त्यामुळे होतं काय कि ज्याला tag केलंय त्याच्या wall वर अशा पोस्ट चा धुमाकूळ होतो. आणि इच्छा नसताना मग बोलायचं कस या विचारातून तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरु होतो. म्हणजे सहन ही होत नाही आणि सांगता पण येत नाही, अशी अवस्था होते.
काही अति हुशार माणसं झाडून सर्व पोस्ट Like करत सुटतात. म्हणजे कुणालाच राग नको या निष्काम कर्मयोगाच्या भावनेतून. मग ती पोस्ट कशीही असो. चांगली असो अथवा वाईट. पण जर अशी सर्व पोस्ट like करणारी व्यक्ती एखादी मुलगी असेल तर मग बऱ्याच वेळा तिच्या नुसत्या साध्या like चा भलताच अर्थ काढला जातो. त्यामुळे खास करून मुलींनी कोणतीही पोस्ट like करताना अथवा कमेंट करताना सांभाळून केलं पाहिजे.
सतत DP बदलाने हे तर आता व्यसन झालेले आहे. पण त्या फोटोंचा सुद्धा गैरवापर होऊ शकतो !तेव्हा जर फोटो टाकायचाच असेल तर तो Low resolution चा टाकावा. त्यावर कॉपीराईट चा symbol असला तर well & good.
तसेच एखादी भडकाऊ पोस्ट टाकताना १० वेळा विचार करावा. की या पोस्ट मुळे पुढे काय होईल ?
त्तुर्तास इतकंच.
बाकी उरलेले नंतर कधीतरी.

-
©सचिन सावंत.

Friday, February 17, 2017

गाणं मनातलं


मा
झं आवडतं मराठी गाणं कुठलं असं जर विचारलं तर पटकन नाही सांगता येणार, बरीच आहेत, चांगली आहेत.
पण (हिंदी किंवा मराठी मधलं) असं कुठलं गाणं आहे की जे ऐकल्यावर मन प्रसन्न होतं, जीव आनंदी होतो, चेहेऱ्यावर एक हलकीशी Smile येते, असं जर कुणी मला विचारलं तर एकाच क्षणात मी सांगू शकतो,
 
फुलले रे क्षण माझे फुलले रे

या भावगीतात काय जादू आहे ते ज्याने हे गाणे ऐकलंय तोच सांगू शकेल.
एका नववधूच्या मनातल्या भावना या गीतात गीतकार नितीन आखवे यांनी छान साकार केल्यात
आणि त्यावर श्रीधर फडके यांचं संगीत आणि आशा भोसले यांचा स्वर असा काही जादू करतो की आपला चेहेरा आपसूकच खुलतो.
ज्यांनी अजून सुद्धा हे भावगीत ऐकलेलं नाही त्यांनी जरूर ऐका.
-
Sachin

Wednesday, February 15, 2017

तिने हो म्हटल्यावर

शब्द अपुरे पडतात
सुचत नाही काही
पण जीव भांड्यात पडतो......
तिने हो म्हटल्यावर

तगमग जीवाची
उदासी आयुष्यभराची
खळबळ मनाची
शांत होते........
तिने हो म्हटल्यावर

विसर पडतो सगळ्याचा
चिंता अन तणावाचा
भावगीत ऐकावे एखादे
वाटू लागते प्रकर्षाने.....
तिने हो म्हटल्यावर

जग सुंदर वाटू लागते
स्वतःच स्वतःला आवडू लागतो
मनातला संभ्रम दूर जातो....
तिने हो म्हटल्यावर

तीच आपल्यासाठी एक
बाकी काही नको
आता मरण आले तरी चालेल
वाटू लागते असे.....
तिने हो म्हटल्यावर

© सचिन सावंत

Saturday, February 4, 2017

मनातल्या भावना | एक गूढ कोडे

नातल्या भावनांचं खरं तर काही सांगताच येत नाही. कधी कधी एवढ्या #हायपर होतात तर कधी खूप शांत. एखादी गोष्ट आपण स्वतःच्या मनात किती काळ दडवून ठेवावी, आपल्या भावना किती काळ दाबून ठेवाव्यात याला सुद्धा काहीतरी मर्यादा असतीलच, मन हे काही शेवटी #यंत्र नाही ना, कारण कधीतरी हा #ज्वालामुखी उफाळून वर येतो, आणि मग त्याचे बरेच #चांगले #वाईट पडसाद उमटतात.
एखाद्यावर प्रेम जरी केले तरी ते त्या व्यक्तीला सांगावं की नाही हा बऱ्याचदा यक्ष प्रश्न असतो. त्या व्यक्तीला काय वाटेल? ती व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करेल? तिच्या मनातला आपल्याबद्दलचा #आदर तर कमी होणार नाही ना ? हा विचार यामागे असतो. बरीच वर्षे या भावना दाबून ठेवल्या जातात, आणि मग एखाद्या #नाजूक क्षणी मन #हळवे होते आणि नकळत आपण त्याच व्यक्तीला काहीतरी बोलून जातो आणि तिला दुखावतो. हेतू मात्र दुखावण्याचा नसला तरी ती व्यक्ती दुखावली जाऊ शकते हे मात्र खरं. ती व्यक्ती जर #समजूतदार असेल तर ती दुखावली गेली असली तरी सर्व विसरून आपल्याला #सांभाळून घेते. तिच्या चांगुलपणामुळे आपल्याला मग अपराधी वाटू लागते.
आणि मग सुरु होतो खेळ, आपल्या मनातलं त्या व्यक्तीला सांगावं कि सांगू नये या #द्विधा मन:स्थितीचा.
आणि मग आपण ती वेळ #टाळायचा प्रयत्न करू लागतो, पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू लागतो, #योग्य #वेळ येण्याच्या #प्रतीक्षेच्या #भ्रमात.

(एका #अप्रकाशित पुस्तकातून साभार.........)

Saturday, January 28, 2017

Facebook चे टॅग

झुकरबर्ग या महान माणसाने फेसबुक सुरु करून दिलं आणि सर्वांना व्यक्त व्हायला एक (सोशल) माध्यम मिळालं.
ज्याचं कुणी (म्हणजे गल्लीतलं कुत्रं सुद्धा) ऐकत नव्हतं त्याला आपलं म्हणणं मांडायला सर्व (आभासी ) जग मिळालं.
पण आता वेगळाच प्रॉब्लेम झालाय हल्ली.
आजकाल कोणीही कुठल्याही पोस्ट ला कुणालाही #TAG करतं, आणि त्यामुळे होतं असं की ज्या व्यक्तीला टॅग केलं आहे त्या व्यक्तीच्या सर्व फ्रेंड्स ना ती पोस्ट दिसते, गरज नसताना. काहीही..... अगदी गुड मॉर्निंग गुड नाईटच्या पोस्ट सुद्धा 100 जणांना टॅग करून पोस्ट केल्या जातात. काही वेळेला देवांच्या, आणि वेगवेगळ्या बाबांच्या पोस्ट सुद्धा असतात त्यात.
अरे बाबांनो, तुमच्या पोस्टच्या #Likes वाढवायचा असतील तर जरा काहीतरी अर्थ असलेल्या पोस्ट टाका ना.

आणि त्यात बऱ्याच जणांना (म्हणजे जे टॅग केले जातात त्यांना) हे ही माहित नसतं की टॅग review आपण करू शकतो, आणि आपल्या अनुमती शिवाय आपल्याला कोणी टॅग करू शकत नाही अशी सेटिंग सुद्धा करता येते. किंवा टॅग बंद सुद्धा करू शकतो. जरा डोकं चालवलं तर हा मनस्ताप टाळणे शक्य आहे. कारण बहुतेक जण समोरच्या व्यक्तीला कसे दुखवायचे याच एकुलत्या एक कारणाने हे टॅग प्रकरण सहन करत असतात.
तेव्हा सेटिंग बदला, आयुष्य बदला 😉
-
© सचिन सावंत