Saturday, December 31, 2016

सरत्या वर्षाला निरोप | Bye Bye 2016

    ज ३१ डिसेंबर २०१६. या वर्षाचा हा शेवटचा दिवस. अजूनपर्यंतच्या सर्व वर्षांप्रमाणेच २०१६ ने सुद्धा बऱ्याच गोष्टी दिल्या. बरीच उलथापालथ झाली या वर्षात. एकीकडे #नोटाबंदी आणि #कॅशलेस इंडिया चे वारे वाहताहेत तर दुसरीकडे मुकेशभाऊ अंबानींनी जीओ 4G द्वारे इंटरनेट क्रान्ती केली. एक तर लोकांना  #फुकट ते पौष्टिक वाटते. आणि आता तर ३१ डिसेंबर पर्यंत फ्री असलेली डेटा आणि व्हॉइस कॉल्सची मुदत ३१ मार्च पर्यंत वाढवली आहे. मग काय विचारायलाच नको.
      या वर्षात मी सुद्धा उरणच्या ६ वर्षाच्या वास्तव्यानंतर परत नेरुळ जवळ शिफ्ट झालो, त्या मागचं एकमेव कारण म्हणजे आमच्या आदित्यची शाळा. चांगल्या शाळेचा प्रभाव किती पडतो हे मला ३ ते ४ महिन्यातच जाणवले. त्याच्यात होणारा Positive बदल मला दिसतोय.
     २०१६ ने मला काही गोष्टी भरभरून दिल्या. सर्वच लिहिणे शक्य होईल असे वाटत नाही, आणि त्यात माझ्या स्मरणशक्ती बद्दल तर न बोललेलंच बरं. पण काही गोष्टी ठळक कोरल्या गेलेल्या आहेत. जसे आमच्या ऑफिस च्या आंतरडेपो कल्चरल competition मधले मी सलग पाचव्यांदा मिळवलेले सोलो सिंगिंग चे प्रथम पारितोषिक, द्रोणागिरी आयडॉल चे प्रथम पारितोषिक, त्या कार्यक्रमानंतर रात्री १ वाजता bike पंक्चर झाल्याने रात्रभर आमचे झालेले जागरण आणि पायपीट. काही विचारू नका.
      या वर्षातली अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्षाने मला मैत्रीच्या परिभाषेवर विचार करायला भाग पाडले. काही नवीन अतिशय जिवलग मित्र मिळाले, कॉलेज मधले काही फ्रेंड्स जे मध्ये काही काळासाठी दुरावले होते ते सुद्धा जवळ आले. आणि अर्थात त्याचे सर्व श्रेय जाते आपल्या सोशल नेटवर्किंग साईट्सना. तर काही जुने Friends ज्यांच्याशी कधी आयुष्यात बोलणे झालेले नव्हते त्यांच्याशी नव्याने मैत्री झाली. आणि इतकी की आता असं वाटलं आम्ही अजूनपर्यंत का बोललो नव्हतो एकमेकांशी. आणि ही मैत्री बेगडी वाटत नाही, खरी वाटते, genuine वाटते.
       सरत्या वर्षातल्या बऱ्याच गोष्टी दुःखदायी होत्या, आणि त्यांचा मनस्ताप सुद्धा झाला, माझे तोंडावर थेट आणि स्पष्ट बोलणे काहींना आवडत नाही, त्याचाच परिणाम असावा. आता ह्याबद्दल बोलण्यात अर्थ नाहीये. कारण अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलं की चांगलं असतं. आणि तसं करायला मी चांगलाच शिकलोय आता. असो,
      नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आपल्याला #२०१६ ला निरोप देऊन #२०१७ चे स्वागत करायचं आहे. बऱ्याच जणांनी आज सेलिब्रेशनचे प्लान्स आखले असतील. काहींनी नवीन वर्षाचे काही संकल्प केले असतील, या सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. जाणाऱ्या वर्षाला असेच जाऊ न देता त्यातून अनुभवाची शिदोरी आपण घेऊया आणि त्या अनुभवातून नवीन काहीतरी शिकून नव्या वर्षात नवीन बदल घडवूया आणि आपले संकल्प, आपले उद्दिष्ट पूर्ण करूया, हीच मनोकामना.
#ByeBye2016
-
© सचिन सावंत

Thursday, December 29, 2016

लोकल डायरी 1

   लोकलमधून पूर्वी मी रोज प्रवास करायचो यावर आता माझा माझ्यावरच विश्वास बसत नाही. कारण सवय राहिली नाही आता पूर्वीसारखी. पूर्वी दरवाजात उभं राहण्यात एक प्रकारचं थ्रिल वाटायचं. मुंबई सीएसटी ते बदलापूर पर्यंतचा प्रवास उभ्याने आणि तो हि दरवाजात उभे राहून करायला का आवडायचं माहीत नाही. आता मात्र तो वेडेपणा वाटतो. नंतर नेरुळ ला राहायला आल्यानंतर नेरुळ पर्यंत दरवाजात असायचो. दरवाजात उभं राहताना सुद्धा आडाण्यागत उभं राहून चालत नाही, ती एक कला आहे. आणि मुंबईकरांना ती कला अवगत आहे. बाहेरचा एखादा आला आणि उतरायचे नसले तरी मध्येच उभा राहिला कि कामातून गेलाच समजायचं. त्यात जर दादर, कुर्ला, गोवंडी, ठाणे, अंधेरी, यासारखी स्टेशन्स असली तर विचारायलाच नको. येथे दरवाजातून बाहेर जाणे आणि आत येणे ऑटोमॅटिक होते. आपल्याला विशेष काही करावं लागतं नाही. हात वर असले तर खाली सुद्धा करता येत नाही. माझा एकदा खिशात ठेवलेला चष्मा खाली पडला होता, त्याचे दर्शन पण झाले नाही. त्यानंतर मात्र चष्मा डोळ्यावरच ठेवू लागलो. काही प्रेमवीर मात्र एवढ्या गर्दीत सुद्धा आपल्या प्रेमिकेला आपल्या बाहूंच्या safe custody मध्ये घेऊन दरवाजात उभे राहतात. त्यांच्या जिगरला मात्र सलाम केला पाहिजे.
आता ड्युटीवर जाणे येणे bike वर होत असल्याने लोकल चा प्रवास बंद झालाय. पण आठवणींचा पेटारा भरलेला आहे, एक एक आठवण बाहेर काढायचं ठरवलंय. बघूया ही डायरी किती भरली जाते.
-
©सचिन सावंत

Sunday, December 11, 2016

व्यक्ती तितक्या प्रकृती

    व्यक्ती तितक्या प्रकृती, की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ? काहीही असो, व्यक्ती बदलत जातात तसेच त्यांचे स्वभाव, त्यांच्या वागण्याची पद्धत, विचार करण्याची क्षमता, जगाकडे पाहायचा दृष्टिकोन सगळं काही बदलतं. असं आहे म्हणून बरं आहे नाहीतर सगळेच झेरॉक्स कॉपी सारखे सारखे वाटले असते.

     झेरॉक्स कॉपी हा शब्द ही तसा चुकीचाच. झेरॉक्स नावाची कंपनी आहे तिने फोटो कॉपी काढण्याच्या मशीन ची निर्मिती केली तर आपण त्या प्रक्रियेलाच झेरॉक्स कॉपी म्हणू लागलो. हे म्हणजे सर्वच टूथपेस्ट ला कोलगेट म्हणण्यापैकी झालं.

     तर विषय माणसांबद्दल होता. माणसंच व्यक्तिमत्व 90% ठरवतो तो त्यांचा चेहेरा. यावरूनच आपण प्रथमदर्शनी तो व्यक्ती कसा आहे हे ठरवत असतो. माणसाचा चेहेरा त्याचे व्यक्तिमत्व ठरवतो हे जवळजवळ सर्वांनाच पटेल. काही अंदाज चुकतात पण. यामध्ये कधी कधी आपला चुकीचा अंदाज असू शकतो, तर कधी एखादा आतल्या गाठीचा असतो. पण चेहेरा बोलतो हे मात्र नक्की. उगीच नाही फेयर अँड लव्हली सारखी उत्पादनं मुबलक प्रमाणात खपतात.

काही लोक्स प्रथमदर्शनीच आपल्याला आवडतात, तर काहींच्या नशिबी ते भाग्य नसतं. मला आठवतं, आमच्या कॉलेज मध्ये एक ख्यातनाम नाट्य दिग्दर्शक आले होते, नव्या टॅलेंट ला शोधायला. ऑडिशन मध्ये जे दिसायला उजवे होते ते सर्वप्रथम निवडले गेले. बाकीच्या इच्छुक उमेदवारांना मात्र विक्षिप्त टेस्ट पार कराव्या लागल्या होत्या. ( उदा. एका पायावर जास्त वेळ उभे राहणे ही काय नाट्य क्षेत्रासाठी अतिआवश्यक बाब आहे ? आणि असे असेल तर त्या गोऱ्या गोमट्या चेहेऱ्यांना का लागू पडला नव्हता तो नियम मला माहित नाही.) दिसायला बऱ्या असणाऱ्या व्यक्तींचा प्रभाव पडतो हे मात्र नक्की. पण काही लोकांचे व्यक्तिमत्व त्यांच्या सहवासात राहिल्यावर उलगडते, काही व्यक्ती इतक्या उत्तम बोलणाऱ्या असतात की त्यांच्याकडे बहुतांश लोक आकर्षित होतात, मग ती व्यक्ती दिसायला इतकी बरी नसली तरीही. लहानपणी मी फारच अबोल होतो, खास करून नव्या लोकांशी बोलायला मी फारच बुजत असे. फार प्रयत्न करून मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केलाय. उत्तम बोलणारा म्हणजे उत्तम वक्ता असे नाही. कारण प्रत्येक उत्तम बोलणारा स्टेज वर उभे राहून भाषण करेलच असेही नाही. फक्त त्याच्या बोलण्याचे सर्वांना आकर्षण वाटते हे मात्र नक्की.

काही लोक प्रथमदर्शनीच आवडत नाहीत, मग ही व्यक्ती कितीही चांगली असली तरी आपला मेंदू त्या व्यक्तीबद्दल नकारात्मक सिग्नलच देत असतो. या कॅटेगिरीमध्ये कोणीही येऊ शकते. अगदी आपले नातेवाईक सुद्धा. तसेच काही लोकांना स्पष्टवक्ते आवडत नाहीत. स्पष्ट बोलण्याने म्हणे त्यांची मने दुखावतात. (माझे काही मित्र माझ्या स्पष्ट बोलण्याने दुखावले? गेले आहेत. पण त्यांच्याबद्दल मला काही वाटत नाही कारण काही मित्र हे तोंडावर बोलणे आवडणाऱ्या कॅटेगिरी मधले आहेत, आणि त्यांची संख्या जास्त आहे.) काही व्यक्ती ह्या मार्केटिंग व्यवसायातल्या असतात. हे लोक आपल्या समोर, आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना आपले कस्टमरच समजतात. मग तो कोणीही असो. माझ्या नात्यातल्या अशाच एका व्यक्तीने मला आपला कस्टमर मानून वजन कमी करायचे एक फॉरेन चे औषध माझ्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न केला होता. आधी दुसऱ्या एका नातेवाईकाला तासभर लेक्चर देऊन झाल्यावर आणि त्याने ते प्रॉडक्ट घेण्याचे मान्य केल्यावर स्वारी त्याला घेऊनच खुशीतच माझ्याकडे आली होती. साफ उतरवली होती मी त्याची. त्या औषधाने म्हणे २० ते २५ किलो वजन एका महिन्यात कमी होत होते. वास्तविक तो नात्यातला असल्याने जसे पहिल्याने ते प्रॉडक्ट घ्यायचे मान्य केले तसेच हा सुद्धा करेल अशी त्याची बहुदा अपेक्षा असावी. पण मी त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. एका महिन्यात जास्तीत जास्त किती वजन कमी व्हायला पाहिजे याची मानके ठरलेली आहेत. आणि एका महिन्यात तो म्हणतो तसे २० ते २५ किलो जर कमी होत असेल तर ते शरीरासाठी वाईटच आहे.(ज्याने ते प्रॉडक्ट घ्यायचे मान्य केलं होतं त्याचाही जीव भांड्यात पडला होता माझ्या बोलण्यामुळे)

   काही लोक एकमेका साहाय्य करू या कॅटेगिरी मधली असतात तर काही अक्षरशः स्वार्थी असतात. काहींना साधी राहणी आवडते तर काहींना आपली (असलेली आणि नसलेलीही) श्रीमंती मिरावण्याचा षौक असतो. काही बोलून मोकळे होतात तर काही मनात ठेवून कुढत बसतात. काहींना सतत काहीतरी करण्याची धडपड स्वस्थ बसू देत नाही, तर काहीजण असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी हे मानणारी असतात. आणि या कॅटेगिरीज न संपणाऱ्या आहेत. या बद्दल अजून बरेच काही लिहिता येण्यासारखं आहे, पण ते पुढच्या एखाद्या लेखात.

© सचिन सावंत

Friday, December 2, 2016

जुन्या नोटा नव्या नोटा

आपले पी.एम. नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर पासून जुन्या (आता जुन्याच म्हणावं लागेल) ₹१००० आणि ₹५०० च्या नोटांवर बंदी आणली. या सर्व नोटा चलनातून बाद करण्यात आल्या असे जाहीर केले गेले. असे केल्याने काळा पैसा बाहेर येईल वगैरे कारणे दिली गेली. नागरिकांनी सुद्धा या गोष्टीला अर्थात चांगला प्रतिसाद दिला. पण एवढे मोठे पाऊल उचलण्यापूर्वी जो होमवर्क करायला हवा होता तो मोदी सरकार ने केला का ? हा आता प्रश्न पडतो. ₹२००० ची नवीन नोट छापणे खरंच आवश्यक होते का याचा गांभीर्याने विचार करायला हवा होता. आज २० ते २२ दिवस उलटून गेल्यावर सुद्धा बहुतांश ATM (कॅश नसल्याने) बंद आहेत. अथवा जी सुरु आहेत त्या मधून फक्त ₹२००० च्याच नोटा निघत आहेत. एकतर या नोटांचा रंग जात आहे (त्यावरून नोटांच्या प्रिंटिंग क्वालिटी ची कल्पना येऊ शकेल) बरं डिझाइन म्हणावं तर ते ही यथातथाच आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ₹२००० चे सुट्टे लवकर मिळत नाहीत. एखादी भाजी घ्यायची तर २००० चे सुट्टे ती भाजीवाली देईल का ?
काळा पैसा संपवायचा असेल तर ₹२००० ची नोट छापायलाच नको होती. आता कमी जागेत जास्त नोटा बसू शकतील. या नोटासुद्धा नंतर काही काळाने बंद होणार आहेत अश्या बातम्या येताहेत व्हाट्सअप आणि एफ बी वर. कळेलच लवकर.
₹५०० च्या नोटा सुद्धा छापल्यात म्हणे. पण मग त्या येणार कधी हातात ? कॅशलेस ट्रान्झेक्शन व्हायला पाहिजे हे ही मान्य, पण या मध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत त्या दूर करायला हव्यात. लोकांमध्ये कॅशलेस ट्रान्झेक्शन बद्दल जागरूकतेची गरज आहे. तरच हे सर्व शक्य होईल.
लोक आपल्याला होणाऱ्या त्रासापेक्षा देशहिताला प्राधान्य देत आहेत ही नक्कीच चांगली गोष्ट आहे, पण सरकारनेसुद्धा लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. आणि सरकारला जर कोणी प्रश्न विचारत असेल तर त्याला देशद्रोही ठरवले जाऊ नये एवढीच माफक अपेक्षा आहे जनतेची.

जाता जाता-
गेल्या ८ तारखेपासून (काही #सन्माननीय अपवाद वगळता) कोणत्याच बड्या आसामी ला #ATM च्या रांगेत उभे असलेले मी तरी पाहिले नाही, अथवा कुठे ऐकिवात सुद्धा नाही. सगळा काळा अथवा गोरा पैसा बहुतेक सर्वसामान्य लोकांकडे असावा.

© सचिन सावंत

Tuesday, November 22, 2016

प्रवास

  प्रवास हे जीवनाचे एक सूत्र आहे असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही, कारण आयुष्य म्हणजेच एक प्रवास असतो जो जन्म आणि मृत्यू यामधील अंतर पार करण्याची क्रिया आहे. आणि या कालखंडालाच आयुष्य म्हणता येईल. आणि या कालखंडात अगणित प्रवास आपण सर्वजणच करीत असतो. फरक फक्त एवढाच असतो की काही जणांना प्रवास करणे आवडत नाही, काहींना आवडतं. प्रवास आवडणाऱ्यांची संख्या नक्कीच जास्त आहे. माणसाने पाण्यासारखं असावं, प्रवाही. एका जागी थांबल्यानंतर त्याचं डबकं होतं, आणि मग त्यावर शेवाळ जमू लागतं. माणसाचं सुद्धा काहीसं तसंच आहे.
    माणसाने नेहेमी प्रवास करावा. प्रवास करणारी माणसे ताजीतवानी असतात, शरीराने आणि मनाने ही. प्रवास कसाही करावा. ट्रेन, बस, लग्झरी कोच, टॅक्सी, रिक्षा, विमान, सायकल किंवा गेला बाजार चालत तरी नक्कीच करता येईल. साधन महत्त्वाचे नाही, प्रवास महत्त्वाचा आहे. कोणी मग आपले प्रवासवर्णन शब्दरूपात उतरवून लोकांसमोर मांडतो, लोकही आवडीने ही प्रवासवर्णनं वाचतात. मला सर्वात जास्त भावलेली प्रवासवर्णने आहेत कै. पु.ल. देशपांडे यांची. अपूर्वाई, पूर्वरंग यांमधून त्यांनी त्यांचा प्रवास अक्षरशः जिवंत केला आहे.
    ट्रेन ने प्रवास करायला मला फारसे आवडत नाही. ट्रेन चा प्रवास comfortable वाटतो लोकांना, पण माझ्या प्रवासाचे निकष वेगळे आहेत. ट्रेन च्या प्रवासामध्ये एक प्लॅटफॉर्म सोडला तर बाजूला माळरान आणि शेती याशिवाय बघायला काहीही नसते. By road जाताना बाजूला सगळं जग असतं, मग हा प्रवास जर एखाद्या bike वरून केला तर क्या बात है. फक्त सोबत कोणीतरी हवं.
   आजच्या घडीला मुंबईत रोज ड्युटी वर जायला लोकलच्या प्रवासात लोकांचा जीव अक्षरशः मेटाकुटीला येतो. काहीजण तर जीवावर उदार होऊन प्रवास करतात. त्यांना मानले पाहिजे.
This is called real मुंबईकर. त्यांना या प्रवासाबद्दल विचारलं तर डोक्यात दगडच घालतील. त्यात सुद्धा काहीजण विरंगुळा शोधतातच. पूर्वी वर्तमानपत्र वाचले जायचे, भजनं म्हटली जायची, पत्ते खेळले जायचे. आता कानात हेडफोन लावून स्मार्टफोन वर एखादा चित्रपट पाहिला जातो. दुनिया बदल चुकी है।
    एक मराठी कव्वाली आठवते आहे, "जीवन इसका नाम है प्यारे, तुझे है आगे चलना रे........"
-
© सचिन सावंत

Sunday, November 20, 2016

श्रीमान श्रीमती

आजकाल आवर्जून पाहाव्यात अशा सिरीयल राहिल्याच नाहीत. जिकडे पाहावं तिकडे डेली सोप च्या नावाखाली पाणी टाकून वाढवलेल्या कालवणासारख्या आजकालच्या मालिका झाल्यात. काही अपवाद असतील, पण हल्ली मालिका बघण्यापेक्षा न्यूज चॅनेल बघून जास्त टाईमपास होतो. सगळा मसाला त्यात भरलेला असतो.
मी तर मागच्या काही दिवसांपासून श्रीमान श्रीमती चे जुने एपिसोड्स पाहतोय YouTube वर. छान सिरीयल होती. राकेश बेदी, रीमा लागू, अर्चना पुरणसिंग यांनी या सिरीयल मध्ये धमाल केली होती, पण त्यातला हुकूम का एक्का होता जतिन कनकीया. केशव कुलकर्णी अर्थात #केकू च्या रोल मध्ये त्यांनी जान टाकली होती. आणि त्यांना सुंदर साथ दिली होती गोखले अर्थात विजय गोखले यांनी. वेगवेगळ्या आयडिया शोधून काढणे हेच त्यांचे मुख्य काम असायचे. केकू, कोकी अर्थात कोकिळा कुलकर्णी, प्रेमशालिनी, गंगामौसी, बॉस शर्मा सर्व पात्रे अप्रतिम होती. त्यात चिंटू सुद्धा धमाल करायचा.
हल्ली या सिरीयल वरून #प्रेरित होऊन तशीच सिरीयल सुरु आहे. काही दम नाहीये त्यात.
हल्लीच्या जनरेशन ने जुन्या काही सिरियल्स आवर्जून पाहाव्यात. सर्वच सिरीयल चांगल्या होत्या असे म्हणणे धाडसाचे ठरेल, पण काही अतिशय चांगल्या होत्या. YouTube सारखे माध्यम आपल्याकडे आहे त्याचा उपयोग जरूर करून घ्यावा.

#श्रीमान_श्रीमती #Evergreen serial

Sunday, May 15, 2016

चित्रपट गीतांच्या बुकात

जच्या तरुण पिढीला जर कुणी विचारलं की एखाद्या हिंदी सिनेमाच्या गाण्यांचे पुस्तक तुझ्याकडे आहे का?
तर ही पिढी आपल्याला खुळ्यात काढल्याशिवाय राहणार नाही.
कारण सध्या अशी हिंदी चित्रपट गीतांची पुस्तकं सहसा सापडणार नाहीत.
आता जमाना इन्टरनेट चा असल्याकारणाने पीसी, laptop किंवा स्मार्टफोन वर चुटकीसरशी आपल्याला Song Lyrics मिळतात. पण एक काळ असा होता की प्रत्येक चित्रपटगृहाच्या बाहेर ही पुस्तके सर्रास मिळायची. आणि लोक ती आवडीने घेऊन पाठ करायची.
हल्लीची गाणी ही फक्त दोन तीन आठवड्यांची मेहमान असतात असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती होणार नाही. कारण तुम्हाला आवडणारी १० नवीन गाणी सांगा असे जर कोणी म्हटले तर हल्लीची TOP गाणी कोणती हे आठवायलाच बराच वेळ जाईल. उलट जुन्या गाण्यांमधली १० काय १०० जरी गाणी विचारली तरी कोणीही फटाफट सांगायला सुरुवात करेल.

Saturday, March 26, 2016

आजकालची गाणी


जकालच्या गाण्यांमध्ये काही दम राहीला नाही बुवा!
जुन्या पिढीच्या तोंडून असे उद्गार निघताना आपण सर्रास ऐकतो. बऱ्याच अंशी ते खरेही आहे म्हणा. कारण जुनी गाणी अवीट गोडीची होती. पण हा जुनेपणा व्यक्तीसापेक्ष बदलताना दिसतो.
कुणाला ७० च्या दशकातली गाणी आवडतात तर कुणाला ८० च्या. कोणी थेट ५० ते ६० व्या शतकातल्या गाण्यांना गोड म्हणतो तर काहींना ९० च्या दशकातली गाणी ही आवडतात. असे म्हणतात कि १९५० ते १०६० हा काळ संगीताचे सुवर्णयुग वगैरे होता. पण याचा अर्थ असा नाही की नंतर आलेली गाणी चांगली नव्हती. प्रत्येक कालखंडाचे स्वतःचे असे एक वेगळेपण त्या त्या वेळेच्या गाण्यांमध्ये आपल्याला जाणवते. जुन्या काळाचे रेकॉर्डिंग करण्याचे तंत्र आजच्या एवढे विकसित नव्हते तरीही त्या वेळेची गाणी आपल्याला अजूनही श्रवणीय वाटतात यातच त्या गाण्यांचे यश आहे असे मला वाटते.
     आज रेकॉर्डिंग चे तंत्र फारच पुढे गेले आहे. सुरात नसलेले सूर सुरात बदलण्याचे ही आता सहज शक्य होते. संगीत दिग्दर्शकाचे काम सध्या कॉम्प्युटर ने खूपच सोपे केलेले आहे. पण गाण्याचा आत्मा ? तो मात्र हरवत चाललाय असे वाटते. आताची गाणी सुद्धा एकसुरीचवाटतात बऱ्याच गाण्यांचे चित्रपट वेगवेगळे आहेत याच्यावर विश्वास ठेवणे जड जाते. आणि ही गाणी महिन्या दोन महिन्यात स्मृतीआड जातात. काही अपवाद आहेत, नाही असे नाही. पण फारच कमी. आज एखाद्या पार्श्वगायकाला जर विचारले कि तुझा कोणता चित्रपट येतोय? तर बहुतांशी त्याला ते सांगता येत नाही. कारण हल्ली एकच गाणे संगीत दिग्दर्शक अनेक गायकांकडून गाऊन घेतात. (त्या त्या गायकाला त्याचे पैसे देऊन) आणि फायनली त्यातले एक ठेवतात. यामागे बहुदा कोणत्याही एका गायकाची मोनोपॉली होऊ नये असाच उद्देश असावा. आणि त्यात हल्लीच्या ओरिजिनल गाण्यांपेक्षा त्याचे डीजे व्हर्जनच अधिक गाजतात. मग ते गाणे कितीही शांत असले तरी त्यात डीजेच्या बीट्स टाकून पार्टी मध्ये वाजवणेबल बनवतात.
    आताच्या पिढीच्या नवोदित गायकांना तर तारसप्तकात किंचाळणे म्हणजे गायन असाच समज झालाय. लहान लहान मुलं ज्यांच्या व्होकल कॉर्ड्स अजून परिपक्व झालेल्या नाहीत ते अशी किंचाळणारी गाणीच गाताना दिसतायत टीव्ही शोज आणि इतर कार्यक्रमांमधून. आवाजात थरथर आणून गायचा नवाच ट्रेंड सध्या इथे पहायला मिळतोय. ज्यांना शास्त्रीय आणि सुगम संगीतातला गंध नाही असे गायक अशा प्रकारची गाणी गातायत सध्या. आणि असा थरथराट कॉपी करण्यात नवीन पिढी धन्यता मानते आहे.
कठीण आहे बाबा सगळेच.....
-
© सचिन सावंत